अक्षरातल्या कळ मंत्रांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
वारीच्या घाटात सुरांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
पुष्पपऱ्यांच्या हुंकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
अत्तरदर्दी व्यापारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
मालवल्यावर समया साती देवघरातिल वेदीवरच्या
खोल जलातिल अंधारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
मंदिरातुनी निनादणारा मधुर नाद घंटेचा ऐकत
णमोकारमय नवकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
शशांक उगवे बीजेचा अन ओवाळाया येता मधुरा
पैंजणातल्या झंकारानी कथा फुलांच्या उमटत गेल्या
ओठांनी मारून फुंकरी राखेतिल पेटता निखारे
डोळ्यांमधल्या अंगारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
फुले मोकळे बोलत गेली तेच सर्व सांगते “सुनेत्रा”
कर्मफळाच्या स्वीकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२…१६/१६)