अबोध सळसळ – ABODH SALHSALH


मायावी चित्तातिल खळबळ कधी प्रसाविते काव्याला
नेणिवेतली अबोध सळसळ कधी प्रसाविते काव्याला

नेत्र पापण्या मिटती जेव्हा भावभावना कोंडाया
मोत्यांसम अश्रूंची सळसळ कधी प्रसाविते काव्याला

संधिकालचे रंग लोपता छायांनी मन आक्रमिता
कातरसमयीची हर हळहळ कधी प्रसाविते काव्याला

नकळत काटे करिता जखमा गुलाबवेड्या हृदयाला
सुवासिक रक्ताची भळभळ कधी प्रसाविते काव्याला

खोल गूढ मौनी डोहाला वळसा घालित जाणाऱ्या
हूड झऱ्याची सुरेल खळखळ कधी प्रसाविते काव्याला

मात्रावृत्त (१६+८+६=३० मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.