आई – AAEE


आई म्हणजे पैंजण छुण छुण
आई नाजुक कंकण किणकिण

आई नसता घरात भणभण
आई असता नसते चणचण

छळे गारठा जेव्हा जेव्हा
आई बनते मऊ पांघरुण

शिणल्यावरती कुशीत घेण्या
आई बनते कधी अंथरुण

नीज यावया मला सुखाची
आई गाते मंजुळ रुणझुण

फुलाफुलातुन सुगंध उधळित
आई व्यापे अवघे कणकण

सुखी कराया तिची लेकरे
आई करिते अखंड वणवण

नकोस जाऊ अता कुठेही
आईमागे सदैव भुणभुण

बांधिन चाली तिच्या सुरांवर
आई करिते जेव्हा गुणगुण

मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)


One response to “आई – AAEE”

  1. खूप भावस्पर्शी कविता. मांडणी अतिउत्तम, वास्तविक असून अलंकृत आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.