चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद
निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद
गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले
वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद
जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत
पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद
चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत
भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली ईद
कोमल हळव्या आठवणींच्या लहरी उठता पाण्यात
पाहुन प्रतिबिंबांची थरथर हृदयात उमटली ईद
गझल मात्रावृत्त (मात्रा २९, १६/१३, स्वर काफिया गझल)