लिहिले काही मुलाफुलांना कळेल ऐसे
लिहिले सोपे माझ्यासंगे वळेल ऐसे
पीडेलाही मुक्ती देण्या लेखणीतुनी
लिहिले पीडा पूर्णपणे ती टळेल ऐसे
कर्मनिर्जरा करण्यासाठी देह झिजविला
लिहिले माझे पुण्य अता फळफळेल ऐसे
धगधगणाऱ्या राखेमधुनी उडत्या ठिणग्या
लिहिले अनवट ठिणग्यांनीही जळेल ऐसे
हृदय जादुई कलम जादुई म्हणुन “सुनेत्रा”
लिहिले मंतर भ्रम भय अवघे गळेल ऐसे
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)