इकडे तिकडे वरती खाली फक्त स्वतःचा उदो उदो
दडून मी पण करते आहे मस्त स्वतःचा उदो उदो
उदे उदे मी उदे उदे तू उदे उदे घन करिताती
गर्जत वर्षत होण्यासाठी स्वस्त स्वतःचा उदो उदो
वेठी धरण्या वळण लावण्या कीर्ती मिळण्या बरा पडे
चुका लपविण्या शासन करण्या सक्त स्वतःचा उदो उदो
पुन्हा उगवती पुन्हा तळपती मध्यान्हीच्या रवीपरी
नकळत करिती झाल्यावरती अस्त स्वतःचा उदो उदो
स्वराक्षरांचा भरण्या प्याला जागुन काढुन रात पुरी
भल्या पहाटे नशेत करती भक्त स्वतःचा उदो उदो