ऐकेन आज काही पण बोलणार नाही
शब्दांस काव्य भरल्या मी छाटणार नाही
सांगून टाक हृदयी कुठले रहस्य दडले
ऐन्यात त्यास लपुनी मी पाहणार नाही
जाई जुई चमेली चाफा नि मोगऱ्याला
टोचूनिया सुईने मी गुंफणार नाही
झाकून नेत्र दोन्ही ऐकेन देहबोली
डोळ्यात भावनांना मी शोधणार नाही
आताच पावसाचे मज बंद पत्र आले
उघडून त्यास सुद्धा मी वाचणार नाही
अक्षरगणवृत्त – मात्रा २४
लगावली – गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/