अंडाकृति तव प्रिये चेहरा खरबुज वर्णी नीतळ सुंदर
कृष्ण कुंतली तुझ्या विपुल घन नेत्रबाण दो सावळ सुंदर
पहाट होता वेलींवरल्या पुष्प-पऱ्यांच्या नयनांमधुनी
झरती रिमझिम धवल सुवासिक दवबिंदुंचे ओघळ सुंदर
पौष पौर्णिमा नेसुन येता निळी पैठणी हरित धरेवर
शिशिरामधल्या चांदणराती चिंब भिजावा कातळ सुंदर
जुन्या जांभळ्या लुगड्यावरती जोडुन तुकडे चिटा-खणांचे
पणजी माझी शिवायची नवी रंगबिरंगी वाकळ सुंदर
तुझ्या ‘सुनेत्रा’ आठवणींचा पिवळा पाला उडवायाला
वळवाआधी येईल का ग लाल गुलाबी वादळ सुंदर
गझल मात्रावृत्त – मात्रा ३२