काफिया रदीफ खास वेगळीच गझल आज
वृत्त तेच चंचलाच पण सुखांत आज बाज
लाट लाट उसळताच खळखळे भरात नाद
हा समुद्र भावभोर अंतरी उधाण गाज
सोडलेस तू जलात तारु स्वैर वादळात
धीर मी न सोडलाय सोडलेन कामकाज
ओहटीत नीर शांत शारदीय चांदरात
मौन सोड बोल भांड पैंजणे बनून वाज
वीर नार देतसे समुद्र देवतेस अर्घ्य
चपलहार बोरमाळ कंठ भरुन मस्त साज
गोठ बिलवरात हात बाजुबंद दो भुजात
मीच देखणे सुरम्य शुभ्र धवल शिल्प ताज
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/