काय लिहू मी कैसे बोलू शब्द थांबती अडखळती
मौन मुग्ध मन सखा सोबती अश्रू गाली झरझरती
कधी अचानक बांध फुटोनी भावभावना फुसांडती
अज्ञाताच्या कड्यावरोनी आवेगाने कोसळती
प्रश्न दाटती कैक मानसी उत्तर त्याचे मिळेलका
पुढच्या जन्मी तरी भेटुया गझलेच्या काठावरती
तुझे नि माझे नाते कुठले मला सदाचे कोडे हे
कोड्यावरती कोडी घालत शब्द वहीवर थरथरती
नको देवपण नको स्तुतीही जगू ‘सुनेत्रा’ खरेखरे
भूक मला तव काव्याची अन तहान त्यातिल नवतीची