काव्यकुंज
….
रंग हळदीचा पिऊन पाने देत सावली उन्हात हसती
सान बालिका उभी तरुतळी बघते आहे वाट कुणाची
गप्पा गोष्टी करावयाला अधीर आतुर उभी कधीची
जर्द लाल पोशाख शोभतो डोईवर टोपी
छायेमध्ये सुबक बाकडे निवांत बसलेले
ऊन त्यावरी तप्त दुपारी खुशाल निजलेले…
……
आकाशाची गर्द निळाई
जांभुळलेली पिवळी राई
मातीमध्ये ऊन खेळते
रागवते आई…
निळी टेकडी तृणपात्यांसह
गुणगुण गाणे गाई
…
निळी टेकडी निळसर
अंबर पुष्पांची रांगोळी सुंदर
हरित तरुंची रांग मनोहर
साद घालती किलबिल सुस्वर
…
रंग लव्हेंडर फिकट जांभळा
निवडुंग असूनही .. नसे टोचरा
जणू कुंचला निसर्गनिर्मित
माझ्यासाठी .. उभा नाचरा
चित्र रेखुनी रंगवीत मी..
धवल घनाला करे सावळा
पहाटवारा झुळझुळणारा
चिंब भिजवती रिमझिम धारा
रंगबिरंगी नयन मनोहर
मनमोरा तव फुलव पिसारा
…
रंगांच्या रंगात भरावे रंग मनाचे
सुसाट वेगे फिरत रहावे वाऱ्यासंगे
हवा कशाला ब्रेक मनाला
संयम माझा पुरतो मजला .. …
….