बास झालं लिहिणं बिहिणं
चल आता हुंदडायला
अंगणातल्या झाडावरचे
पिवळे गुलाब मोजायला
उमलते गुलाब
टपोऱ्या कळ्या
खिदळतात हसतात
वेड्या खुळ्या
डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन
फुलांचे फोटो घेतंय कोण
हिरव्या पोपटी पानांवर
गुलाबाच्या गालिच्यावर
प्रेम तुझं नि माझं
हसतंय पाकळी पाकळ्यांवर
तेवढ्यात आल्या कित्ती बाया
साळकाया अन माळकाया
फुलं तोडून पसार झाल्या
माझं हसू घेऊन गेल्या
बघून त्यांचा असला खेळ
धाई धाई रडले मी
ओक्याबोक्या झाडांवर
वीज होऊन पडले मी
पुन्हा पाणी देत राहिले
अवतीभवती लक्ष ठेवले
झाड पुन्हा फुलत गेले
कळ्या आल्या फुले उमलली
पिवळ्या फुलात पाने लपली
आनंदाने बाग खुलली