केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे
ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे
शब्दांस गोल झाल्या लावून धार डोळे
बनुनी कलम दुधारी करणार वार डोळे
पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा
पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे
माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे
माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे
नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला
ठाऊक ना जरी हे जग पाहणार डोळे
तू नेत्रदान केले मी देहदान करते
मौनात माय म्हणता झालेत पार डोळे