सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे
गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे
अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे
समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे
कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी
लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे
वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची
विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे
पिवळ्या जमीनी कुरण जांभळे निळसर गाभारे
दिवटी जळाया सकल देवळी दगड जिता भासे
घुमटात घूं घूं घुमुन पारवे उडत नभी गाती
मिरवीत डोई कळस केशरी गझल पिता भासे
ग गडे झपूर्झा जपत मंत्र हा गगन खुले झाले
कळली झपूर्झा सजल अंतरा प्रिय खलिता भासे
लगावली – ललगाल/गागा/ललल/गालगा/लललल/गागागा/
मात्रा – २७, ओळी १४
प्रत्येक चरणात १९ अक्षरे, १२ व्या अक्षरानंतर यती
वृत्त – शार्दूलविक्रीडित