गझला लिहिते मी कवयित्री काय द्यायचे नाव मला
गझलकार की गझलकारिणी प्रश्न सोडवुन पाव मला
जरी तुला ना सुचते सुंदर मनाजोगते नाम अता
सुजला सुफला जमिनीवरचे दे गझलांचे गाव मला
मी तर साकी नाजुक कणखर चषक भराया उभी इथे
प्राशुन त्यातिल पेय नशीले मोज दिलेले घाव मला
सौदा केला ना काव्याचा ना माझ्या स्त्रीदेहाचा
निश्चय व्यवहाराला जपले जरी भेटले साव मला
ओढ दर्शनाची तुझिया मज भल्या पहाटे जागविते
मूर्तीच्या नयनातिल निर्मल साद घालिती भाव मला
मी दिग्दर्शक गृहस्वामिनी अंगी माझ्या कैक कला
नाना रूपे मी वावरते गाठायाला धाव मला
तळास गाठुन वरती येता नभी सुनेत्रा सहज फिरे
फक्त स्वतःच्या जाण गुणांना नकोच देऊ ठाव मला
मात्रावृत्त (१६+१४=३० मात्रा)