गणपती येत आहे ताट भरा मोदकाचे लवकरी लवकरी
गणपती येत आहे वसन नेस नऊवारी भरजरी लवकरी
पावडर पीतांबरी आण घास विसळ भांडी तांब्या-पितळेची
गणपती येत आहे सान गोड पोर हो तू परकरी लवकरी
तबकात अष्टद्रव्ये लख्ख पीत ताबाणात फुले रचु तांबडी
गणपती येत आहे आरतीस जमा सारे मम् घरी लवकरी
गणगोत स्वागताला खास आम आले जुने पागोट्यात नव्या
गणपती येत आहे चाळ बांधु झान्ज घंटा धर करी लवकरी
ढग शुभ्र आभाळात दाटलेत कोमलांगी नाचरे सावळे
गणपती येत आहे निळ्या नभा चुंबायास बन परी लवकरी
वन हरित भादव्याला सोनपात केवड्याची सुवासिक माळते
गणपती येत आहे गुलाबजल शिंपायास पड सरी लवकरी
जमलेत भक्त दारी कॅडबरी प्रसादात वाटूयात झणी
गणपती येत आहे काम सोड थोडीतरी नट बरी लवकरी
शुद्ध मन रहायाला पूज बाळ गणेशाला सोवळे नेसुनी
गणपती येत आहे मनातील अंद्धश्रद्धा त्यज तरी लवकरी
अक्षरी ओंकारात पहा मला सांगायास ऋद्धि अन सिद्धिसह
गणपती येत आहे जाण खऱ्या दैवतास अंतरी लवकरी
गझल मात्रावृत्त (मात्रा ३५, ५/७/६/७/१०/ )