मी पाहते मला अन सुटते सुसाट गाडी
मी वाचते तुला अन बनते विराट गाडी
डब्ब्यात बैसलेले सारेच शब्द वेडे
शेरात कोंबता मी होते पिसाट गाडी
घेताच वेग चाके गगनात धूर ओके
ओझे कितीजणांचे ओढे मुकाट गाडी
मस्तीत शीळ घाले वळवून देह डोले
जो नियम पाळतो त्या देतेच वाट गाडी
जोडून लाकडांना बनली नवीन बग्गी
दौडे मजेत घोडा चढणार घाट गाडी
वाटे जरी खटारा फिरवेल ती खराटा
ना पाडते कुणाला जाते तराट गाडी
जर खोडसाळ कोणी अडवेल मार्ग जेंव्हा
तेंव्हा भल्याभल्यांची लावेल वाट गाडी
जर कोंबशील पैका भरण्या बळे खिसे ते
तव फाटक्या खिशाला बसवेल चाट गाडी
हातात खेळता हा पैसा कमाइचा रे
करते अता खुशीने बाजारहाट गाडी
शेरात ठासशी का इतुका अहंपणा रे
शब्दांवरी तुझ्या मग मारेल काट गाडी
वाटेल जर गझल ही हृदयातल्या फुलांना
तेंव्हाच मग तिचीरे होईल भाट गाडी
ना शब्द खेळवीते ती रांधते घुसळते
होऊन अन्नपूर्णा वाढेल ताट गाडी
तू तास लाकडाला अन रंग दे तयाला
तेंव्हाच मग तुझा रे मांडेल पाट गाडी
लागू नकोस माझ्या नादास व्यर्थ आता
इमले तुझे हवेतिल करते सपाट गाडी
गमजा तुझ्या पुरे रे गाडीवरून आता
समजू नको दुधखुळी लावेल नाट गाडी