कलंक नाही डाग न कसला हे तर हळदी कुंकू घन वर
अभ्रांच्या गर्दीत अंबरी खग ताऱ्यांचे नाजुक झुंबर
गुरे वासरे वाटेवरती गळ्यात मंजुळ घंटा किणकिण
सांजेच्या केशरी करातिल झळाळणारे कंकण बिलवर
पुष्पपऱ्यांचे रूप घेउनी सारवलेल्या अंगणातुनी
निळ्या जांभळ्या बाळ पाहुण्या भूचंपा डोलती भुईवर
हवेत गोरज लाल सावळा वडावरी पक्ष्यांचा कलरव
शेणसड्यावर रांगोळीतुन गुलबक्षीची फुले तरूवर
जुन्या पुराण्या आठवणींनी अंतर होता होता कातर कातर
सांजवात लावून पाहते हृदयी चोविस मी तीर्थंकर