झरझर धारा गर्जत याव्या तप्त दुपारी
उतरुन याव्या डोळ्यांमधुनी सुस्त दुपारी
भरता डोळे भरती पाने गर्द निळाई
टपटप झरते तुझी आठवण फक्त दुपारी
अवतीभवती किती धावपळ वर्दळलेली
कशी लावु मी वर्दळीस या शिस्त दुपारी
संघ्याकाळी उरेल काही लिहावयाला …
वाटत नाही करेन सारे फस्त दुपारी
असेच काहीबाही सुचते येते वादळ
शोधत बसते जुनेपुराणे दस्त दुपारी
अमूल्य आहे पहाट अपुली नित्य नवी ही
हुरहुरणारी कातर संध्या मस्त दुपारी
पसरत गेले ऊन घडीतिल घडीत विखरुन
घडी मोडते नव्या वहीची चुस्त दुपारी