घुबडे – GHUBADE (OWLS)


कोंदटलेले धुके वितळले नभ जलदांनी भरले अवचित
हॅरी पॉटरचेच जादुई कुंभ नभी गडगडले अवचित

डिमेंटॉर्सच्या कृष्णकलांनी झाकोळुन आत्मे घुसमटता
आश्रयदाते आकाशातिल मरुतातुन अवतरले अवचित

छडी फिरवुनी “पड पड धो धो” मंत्र जपतसे वीज नाचरी
मंतरलेल्या मग मेघातुन मौक्तिक जल टपटपले अवचित

सुसाट चक्रीवादळ गरगर ढगांस फिरवुन धडका देता
आभाळाचे टपोर श्यामल नयन कैक झरझरले अवचित

मुसळधार हस्ताने मगलू टपालसेवा बंद पाडिता
पत्रे देण्या घुबडे आली कबरी पिग फडफडले अवचित

भुकटी राखेची भुरभुरता अर्ध्या विझल्या काष्ठांवरती
उकळुन कढईतिल नीराचे गगनी घन थबथबले अवचित

प्रकाशकिरणे उदकामधुनी नवरंगी तारांस छेडता
दिडदा दिडदा सतार बोले हृदय हळू धडधडले अवचित

गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.