छळवादी रिपु पूर्ण जळूदे
शुद्ध जलाने हृदय भरूदे
मनात किंतू कुणाच्याच ना
हीच अवस्था खरी टिकूदे
माझ्याही अधरातुन झरझर
तुझ्या गझलमाला बरसूदे
चंचल हरिणी शांत रागिणी
तिच्या उरी संगीत झरूदे
तुडुंब विहिरी जोहड धरणे
तळी जलाशय तृप्त असूदे
गाठवलेले गोठवलेले
मणी मोकळे घन वितळूदे
मित्र मैत्रिणींसंगे निर्भर
मुक्त ‘सुनेत्रा’ ला विहरूदे
मात्रावृत्त(१६ मात्रा)