फुला-पाखरांचे थवे गात आले
मनाचे गुलाबी गडद पान झाले
पुन्हा झिंग येण्या तशी जांभळी ती
हळदुली उन्हाने भरूयात प्याले
पुरा-वादळाच्या तडाख्यात काळ्या
लव्हाळीपरी तृण झुकूदेत भाले
झरा पीतवर्णी प्रभाती झळाळे
दिशांचे फिकुटले वसन हे उडाले
मृदुल पाकळ्यांवर दवाचा फुलोरा
जसे कर्पुरांचे निळे दीप झाले
दुपट्ट्यात हिरव्या हसे मुग्ध चाफा
सुगंधात ओल्या मयुर चिंब न्हाले
थिटी अक्षरे तव जरी मौक्तिकासम
फराटे भुरे मम फळाया निघाले
तुरे केशरांचे शिरी मेघ मिरवे
कपोतास शुभ्रा जुई साद घाले
कुरळ कृष्ण कुंतल जश्या जलदमाला
बघोनी ‘सुनेत्रा’ धवल घन पळाले
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.