नकोच नाटक जा जा मूढे पुरे जाणले होते तुजला मी तेव्हाही अन आताही जाणत आहे
वेळ यायच्या आधी नसते बोलायाचे म्हणुन बोलले कुणास नाही मन आताही जाणत आहे
एकटीच का होती बसली निळावंतीसम तप्त दुपारी सोंग घेउनी विवाहवेदी वरती सजुनी
ताप तापली हलकी झाली ढगात गेली जलदामधुनी कुठे बरसली घन आताही जाणत आहे
शृंगाराने हुरळुन गेली पुन्हा कोरडी ठक्क जाहली सर्पिण झाली कात टाकली उजळ जाहली
खोटेनाटे बोलायला ना चाचरली ऐन्यापुढती फक्त मिरवली तन आताही जाणत आहे
सरड्यासम नवनवीन रंगी स्वतःस बुडवत गुंत्यामध्ये अडकत गेली नकळत तिचिया कैद जाहली
कैक जन्मिच्या चक्रामधुनी कुणाकुणाला फिरव फिरवण्या स्वतःच फिरली जन आताही जाणत आहे
जिनानुयायी वीर अहिंसक सुनेत्रास ती काय समजली कपटी कुलटा मायाचारी भोंदूबाई
वनहरिणांची शिकार करण्या स्वार्थासाठी गलोलीतला दगड जाहली वन आताही जाणत आहे
गझल मात्रावृत्त – मात्रा ५६