जीवनात अमुच्या अवतरली खळाळणारी पावन गंगा
समृद्धीची बाग फुलाया माय मराठी साधन गंगा
खरी साधना फळास आली पवनमावळी जादू झाली
गझलेमधल्या मौक्तिकातुनी झरझरते मनभावन गंगा
मुळा मुठा भीमा अन पवना दुथडी भरुनी संथ वाहती
नीरेकाठी ध्यानासाठी घालुन बसली आसन गंगा
सूर ताल अन लयीस साधत काव्यानंदी बुडवायाला
मुरलीसम कृष्णाच्या गुंजे बनात नंदन कानन गंगा
कैक माध्यमातुनी तावुनी सुलाखुनी भूवरी झळाळे
णमोकार मंत्राने भारित शुद्धमती जिनशासन गंगा
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)