सह्याद्रीच्या डोंगररांगांतुनी धबाबा धबाबणारा प्रपात सुंदर
प्रेमावेगाने कोसळतो शुभ्र खळाळत खळाळणारा प्रपात सुंदर
अवखळ मारुत प्रचंड ऊर्जेने भरलेला जलौघास आलिंगन देता
पंख पसरुनी हटून मागे त्यास चुंबतो भरारणारा प्रपात सुंदर
पंचभुतांच्या जिवंत गात्री उदकांतिल संवेग वायुचा प्रीत तोलता
जिवाशिवाचे मीलन होता अखंड दौडे उधाणणारा प्रपात सुंदर
गर्जत उसळत अन फेसाळत दरीस भेटे कड्यावरुन झेपावत खाली
रौद्र जरी भासतो राक्षसी करुणामय घन फुसांडणारा प्रपात सुंदर
सळसळते संगीत विजेचे भरून हृदयी आभाळातिल मेघफुटीसम
कृष्ण कातळी थिरकत नाचत गातो गाणे धडाडणारा प्रपात सुंदर
कडेकोट धरणाची द्वारे उघडायाला भाग पाडुनी धो धो वर्षत
श्रावणातले ऊन प्राशुनी चिंब रंगला झळाळणारा प्रपात सुंदर
अतिशय पावन “अतिशय” घडले तप्त मृगजळी खडकावरती नीरज फुलले
“अतिशय” बघण्या वळणावरती झुकला आहे कडाडणारा प्रपात सुंदर
गझल मात्रावृत्त (मात्रा ४०)
One response to “जिवाशिवाचे मीलन – JIVAA SHIVAACHE MEELAN”
Very nicely written poem.