कटू सत्य आम्ही प्राशियले तुम्हीही प्राशून पहा
पचल्यावरती पचले आम्हा असे खरे बोलून पहा
जीवनभक्ती कळण्यासाठी सत्य घोळवुन माधुर्यात
मृदूपणाने कसे उतरते नकळत कंठातून पहा
पुण्य जाळुनी उदाधुपासम सुगंध भरता तनीमनी
तपवुन देहा उपवासाने संयम गुण जाणून पहा
कुणी एक जगतास फिरवितो भ्रम डोक्यातुन त्यागुनिया
अंतरातल्या प्रतिबिंबाला अकिंचन्य होऊन पहा
खूप जाहले शोधुन भटकुन पाषाणी राऊळी घनी
शुद्धात्म्यातच झळके चर्या ब्रम्ह त्यात राहून पहा