मोक्षाच्या द्वारावर टाळे कैक लागले होते
अनेक जुडग्यांच्या भाराने छल्ले झुकले होते
एकच टाळा खरा शोधला मी तर्काने माझ्या
एकच छल्ला उरला हाती बाकी पडले होते
हातांमध्ये घट्ट पकडला किणकिणणारा छल्ला
छल्ल्यावर किल्ल्यांचे जुडगे मस्त लटकले होते
सोन्याच्या किल्ल्यांचा जुडगा मी नजरेने टिपला
रत्नत्रय पारखी नेत्र मम् त्यावर खिळले होते
ओंकारातिल पाच अक्षरे पंचपरमपद रूपी
जुडग्यातिल एका किल्लीवर नाव उमटले होते
सत्य जाणण्या खुणावता मज सतधर्माचा टाळा
कलमरुपी किल्ली फिरवुन मी कुलुप उघडले होते
मोरपिसाचे कलम जादुई बिंब तिचे मम् हृदयी
वल्हविता नावेस सुनेत्रा तरंग उठले होते
गझल मात्रावृत्त (मात्रा २८)