जे असेल पूर्ण सत्य ते सदा झळाळणार
दगड मंत्र बोलणार अन मृदा झळाळणार
रंग रूप अन स्वरूप प्रकटतील गुण अनेक
मुग्ध मौन हर कळीत नव अदा झळाळणार
थंड बोचऱ्या हवेत मोहरून शेत रान
सावळ्या भुईमधील संपदा झळाळणार
मोति आणि पोवळ्यात पारिजात बहरताच
रातराणिच्या फुलांत शारदा झळाळणार
चंद्र चूर चांदण्यात चंचला झुले हवेत
गोरट्या तिच्या करात घन गदा झळाळणार
शिशिर ध्यानमग्न शांत मोद वाटतो मरूत
हर्ष सौख्य पांघरून हर्षदा झळाळणार
मंदिरात तेवणार स्त्रोत रूप आत्मज्योत
ज्ञानदीप उजळताच ज्ञानदा झळाळणार
वृत्त – चंचला, मात्रा २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/