काही लिहून झाले काही अजून बाकी
जिंकून शेर आले काही अजून बाकी
चढतेच धार शब्दां गझलेत थेट शिरता
बनलेत तेच भाले काही अजून बाकी
ओठांवरी फुलांचे भरले अनेक झेले
काही दवात न्हाले काही अजून बाकी
तोडून शृंखलांना झालेत मुक्त पक्षी
काही नभी उडाले काही अजून बाकी
काही अजून भोगी संतप्त भासताती
काही उभे जळाले काही अजून बाकी
खड्गासनात योगी अजुनी उभे तपाला
काही पुरे म्हणाले काही अजून बाकी
व्हावे कुणी पुढे हे ठरवून टाक आता
काही अता निघाले काही अजून बाकी
हा खेळ मारण्याचा वाटे नकोनकोसा
काहीच ढाल ल्याले काही अजून बाकी
चोरून ढाल माझी ते वाचतात सारे
वाचूनिया पळाले काही अजून बाकी
प्राशून वीष काळे मी कृष्णकंठ होता
काहीच रिक्त प्याले काही अजून बाकी
अभिषेक पावसाने केला अजून कोठे
परतून ढग निघाले काही अजून बाकी
लाटांवरीच फिरती अतृप्त मत्स्य कोणी
काही जळी बुडाले काही अजून बाकी
झाले जरी अवस मी ते चांदण्यात भिजले
ज्ञानात चिंब न्हाले काही अजून बाकी
मोहांध श्वापदांना तुडवेन मीच पायी
काही जरी गळाले काही अजून बाकी
सारेच शेर माझे मी माय शेरणी रे
काही मला कळाले काही अजून बाकी
पाण्यात वासनांचा हैदोस माजवूनी
झालेत मौन नाले काही अजून बाकी
का शेर हे खुशीने डुलतात सांग मजला
माणूस ते न झाले काही अजून बाकी
बाकी न शून्य होते उरतोच एक तेथे
काढावयास साले बाकी अजून काही
फिटणार पांग सारे फुटल्यावरीच वाचा
संघर्ष आत चाले काही अजून बाकी
दानात मी दिल्यावर पाण्यातला करंडा
बिंबात कर्म हाले बाकी अजून काही
ठोकून काय झाले जाळून काय झाले
कामास ते निघाले बाकी अजून काही
ऐन्यात मीच हसते काचेत मीच दिसते
गुंडांस मार भाले काही अजून बाकी
ही भागदौड सोडू काठावरी विसावू
मी ना इथून हाले बाकी अजून काही
मजला अजून भावे संगत निखळ मनांची
म्हणुनीच खेळ चाले बाकी अजून काही
माझा कुणी न शत्रू मज आस शुद्धतेची
आले फिरून भाले बाकी अजून काही
बाकी अजून काही असली तरी असूदे
भाज्यात प्रेम आले बाकी अजून काही
मी मानिनी ‘सुनेत्रा’ कळणार सर्व मजला
काही खरे म्हणाले काही अजून बाकी
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा २४)
लगावली – गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/