पूर्व दिशेला तांबड फुटता तप्त जाहले
रक्तिम्यात त्या बुडून जाता रिक्त जाहले
पहिल्या धारेच्या गझलेने तृप्त जाहले
चवीचवीने तिला प्राशिता मुक्त जाहले
पहाटवारे टपले होते बोल टिपाया
चुंबून त्याला कषाय माझे गुप्त जाहले
भावभावना सांडत होत्या पापण्यांतुनी
शिस्त लावण्यासाठी त्यांना सक्त जाहले
चोर लुटारू लुटण्या येता तुला ‘सुनेत्रा’
अवगुण उघडे गुण सारे मम सुप्त जाहले
मात्रावृत्त (१६+८=२४ मात्रा)