सकाळी दुपारी लिहावी गझल
तिन्हीसांज होता स्मरावी गझल
गझल रडव रडवी कधी गाउनी
हझल मग लिहावी पुसावी गझल
रदीफास टाळे गझल जेधवा
म्हणे काफिया मग हरावी गझल
पहाटे प्रभाती सकाळी सजल
दवाने उन्हाने नहावी गझल
लहर वारियाची अधर चुंबिता
मिटावी फुलावी झुलावी गझल
नयन कारण व्हावी तनू कापरी
तिच्या कंपनांनी टिपावी गझल
झरझरा खिरे ज्ञान बिम्बातुनी
तशी लेखणीतुन झरावी गझल
खऱ्या क्षेत्रापालास शासन कसे?
पुसुन प्रश्न हा कडकडावी गझल
जरी व्याप चिंता सुचावी गझल
निळ्या काचपात्रात घ्यावी गझल
जरी एकटी ती न भेटे कुणा
मला भेटण्या फक्त यावी गझल
फुले माळुनी देह शृंगारुनी
वधू लाजरी खास व्हावी गझल
जरी तिखट वाटे किती गोड ती
कळाया मुळासकट खावी गझल
अनेकांत रूपे जन दावण्या
दिमाखात मिरवेल भावी गझल
कधी सुप्त होते कधी लुप्त ती
नकाशात तेव्हा दिसावी गझल
जरी डाग केले तिला कागदी
तरी सौरभाने भरावी गझल
भरायास वारे जरी शीड ना
बनुन होडके मम तरावी गझल
कधी ना जळाली कुणावर जरी
तरी भस्म होण्या जळावी गझल
कशाला नलीका तिला प्राशण्या
पुरा घोट घेऊन प्यावी गझल
जिवाला असे ध्यास प्रियचा जसा
‘सुनेत्रा’ तशी तव रहावी गझल
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगा/