चल घे हाती सूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
चल ये जाळू धूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
हृदयामध्ये देव हासती तीर्थंकर चोविसी
चल ते पाहू रूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
फुगडी झिम्मा खेळ अंगणी माझ्या बघ रंगले
चल रे खेळू खूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
नभ मेघांनी कृष्ण जाहले धारा झरती निळ्या
चल दे खोदू कूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
पलिता आणू चूल पेटवू लोणी कढवावया
चल हे गाळू तूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
नमनासाठी तेल ओतणे हंडाभर नावडे
चल गे गाऊ भूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
जन का आले शोध घ्यावया चोरांगत रातिला
चल बे टाळू छूप पाखडू मोत्यांसम जोंधळे
अक्षरगण वृत्त – मात्रा २७
लगावली – ललगागागा/गालगालगा/गागाललगालगा/