तुझ्याचसाठी अजूनही मी जुन्या स्मृतींच्या उन्हात आहे
झरे इथे लेखणी सुवासिक नव्या सुरांनी वहात आहे
कधी न कळले तुला जरी हे तुझ्यात गाणे सदैव माझे
तुडुंब भरले हृदय जलाने तुझीच प्रतिमा तयात आहे
खरेच मी सावरेन आता पुन्हा पुन्हा मी पडेन जेव्हा
तुझीच काठी असेल हाती तिच्याचसाठी घरात आहे
नको कुठे मज नभात शोधू तुझ्यात मी सावलीप्रमाणे
खुलेल जेव्हा तुझी कळीही फुलावरी मी दवात आहे
कधी तुझ्या मी पुढे असावे कधी कधी मी असेन मागे
तुझ्यासवे चालण्या निरंतर अचल तरी मी चलात आहे
अक्षरगण वृत्त – मात्रा ३२
लगावली- लगालगागा/ लगालगागा/ लगालगागा/ लगालगागा/