तुला प्राशुनी मी, तुझे रंग ल्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे
तुझे अंग माझ्या, जलौघात न्हावे, जिवा ध्यास होता, अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे
कुठेही असूदे, मनाला दिलासा, खरी तूच गझले, तुझी मूर्त माझ्या, समोरी असावी
तुझ्या लोचनातील काव्यास प्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा, असे वाटते रे
तुझा भास होता, उगा लाज-लाजून ऐन्यात माझ्या, तुला मी पहावे, निळ्या लेखणीने
उखाणे रचावे, तुझे नाव घ्यावे, जिवा ध्यास होता, अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे
तुझ्या संगतीने, प्रवासास जावे, विमानी बसावे, तुला हासवावे, खरे प्रेम द्यावे
तुला साथ देण्या, तुझे हात व्हावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे
नको दूर जाऊ, पुन्हा खार खाऊ, सुनेत्रात माझ्या, सदा तू रहावे, जगाला दिसावे
फुलांच्या जहाजा, किनाऱ्यास न्यावे, जिवा ध्यास होता, अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे
अक्षरगणवृत्त ( मात्रा ५०)
लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/