मी जे लिहिते त्यातुन सुंदर सारे निघते
मी जे जपते त्यातुन सुंदर सारे निघते
घास टाकुनी जात्यामध्ये भरून ओंजळ
मी जे दळते त्यातुन सुंदर सारे निघते
जीवांना रक्षाया अविरत सत्य जाणुनी
मी जे रचते त्यातुन सुंदर सारे निघते
गोष्टींमधुनी विचार शिवरुप मनी मुलांच्या
मी जे भरते त्यातुन सुंदर सारे निघते
ब्रह्मांडातिल अन सृष्टीतिल मम पिंडातिल
मी जे बघते त्यातुन सुंदर सारे निघते
सहज असूदे वा हेतूने मुखातून मम
मी जे वदते त्यातुन सुंदर सारे निघते
मम आत्म्याला साक्ष ठेवुनी भक्तीपूर्वक
मी जे नमिते त्यातुन सुंदर सारे निघते
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)