जाणिवेची जागृती मम नेणिवेची चारुता
मजजवळ सौंदर्यदृष्टी आत्मियाची शुद्धता
गातसे सौंदर्य माझे वाहते गात्रातुनी
मी फिदा माझ्यावरी मज शोभणारी मुग्धता
पाहशी तू मजकडे अन मी तुझी होतेच रे
मौन तू घेशी जरी रे जाणते मी रम्यता
रोखुनी मी पाहते अन गाळुनी मी ऐकते
बोलते मी नेमके अन जाणते तव सौम्यता
जोडले नाते मनाने भूतकाळा जाणण्या
वर्तमानानेच जपली भावनांची भव्यता
नाव माझे का लिहू मी सांगना मक्त्यामधे
कोरले हृदयावरी ते अर्थ सुंदर जाणण्या
गोडवा वृत्तीत आहे गोडवा शब्दातही
सत्यता ऐन्यात झळके चांदण्याची शुभ्रता
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा २६)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा/