पंचकर्म आयुर्वेदातिल खूप लाभकारी
बस्तीसाठी साजुक आहे तूप लाभकारी
अभ्यंगाने स्नेहन करुनी पूर्ण शरीराचे
वाफ दिली जर कायेला तर रूप लाभकारी
भाळ शिरावर धार औषधी तेल नि काढ्याची
जणू मनाला शांत कराया भूप लाभकारी
उदवर्तन अन नस्य करावे गरज असे तेव्हा
जसे कीटकां पळवायाला धूप लाभकारी
हवा अन्न पाणी निर्जंतुक मिळण्या जीवांना
डोंगर निर्झर शुद्ध जलाचे कूप लाभकारी
गझल मात्रावृत्त,मात्रा २६,(८+८+१०)