पण नको कुरवाळणे ते – PAN NAKO KURAVALHANE TE


मैफिलीतुन घ्यावयाचे राहिले आलाप काही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते
गोडवा भावात होता ते तुला कळलेच नाही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते

गोल होता नीलवर्णी घागऱ्याचा घेर मोठा पोलक्याची तलम बाही मलमलीचा पोत होता
शुभ्र त्या तव पोलक्याची मळविली त्यांनीच बाही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते

पुरविली त्यांनीच वस्त्रे दीन त्या अबलेस लुटुनी वासनांशी सख्य केले जिंकण्याला लोक तीन्ही
अंतरंगी लोभ असुनी नग्न झाले देह दाही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते

मातृभूमीच्या जिवाशी खेळणाऱ्या मूढ लोकां नरकधामी धाडणारा मीर यात्री कोण आहे
का बरे तो येत नाही भेटण्या मीरेस राही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते

कर्म ज्याचे त्यास भोवे जाणुनीही जीव मोही आसवांना ढाळ ढाळी भूतकाळा धरुन ठेवी
मृत शवाच्या सजवलेल्या देखण्या ओझ्यास वाही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते

अक्षर गण वृत्त – मात्रा ५६
लगावली – गालगागा/ ८ वेळा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.