सोनचाफा दरवळावा अंतरी
नाद घंटेचा घुमावा अंतरी
मृगजळासम गावसुद्धा मिथ्य ते
वाहता ओढा भरावा अंतरी
मिथ्य ती आहे कळावी वासना
सत्य माझा भाव गावा अंतरी
जाळतो वैशाख वणवा सागरा
धार झरता चिंब व्हावा अंतरी
शब्द ना कळले जरी मज सर्व ते
अर्थ त्यांचा आकळावा अंतरी
मूर्त मी बघण्यास जाई मंदिरी
जिनसखा मजला दिसावा अंतरी
मी खरी आहे सुनेत्रा तव सखी
मी तुझा ऐकेन पावा अंतरी
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा १९)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगा/