पुन्हा पुन्हा का भरिशि प्याला पुरे जाहले साकी
हृदय भडाग्नी पूर्ण निमाला पुरे जाहले साकी
कोळुन प्याले अक्षर मात्रा उकार काना वळणे
विसर्ग उरला फक्त तळाला पुरे जाहले साकी
दवात भिजणे सुकुन तडकणे मिरवत मिरवत टिकणे
चक्र अघोरी हवे कशाला पुरे जाहले साकी
भ्रमर भृंग हे अवती भवती फूलपाखरू बघते
मधू वाटणे सांग फुलाला पुरे जाहले साकी
पहाटवारा पूर्वेकडचा गूज कराया येता
कटू स्मृती त्या नको उशाला पुरे जाहले साकी