प्रभात होते निशा व्हावया रंगांतर केले
प्रभातीस मी ब्यळग म्हणोनी भाषांतर केले
बकुळीने निशिगंध प्राशुनी गंधांतर केले
न्यूनगंड सोडून मनातिल गंडांतर केले
देह सजविण्या सुडौल माझा वस्त्रे मी ल्याले
नाटकातले पात्र बनाया वेषांतर केले
भावभावना सुरभित कोमल शब्दांकित करुनी
गुजगोष्टींचे फुलांत सुंदर रूपांतर केले
वेगवेगळे स्वभाव कळण्या सृष्टी धरणीचे
कधी जलातुन आकाशातुन देशांतर केले
नजरशरांनी चढल्यावरती गालावर लाली
ऋद्धीच्या नकळत बुद्धीने विषयांतर केले
रत्नत्रय गुण परिस लाभुनी झळाळता आत्मा
त्यागुन काया जीवात्म्याने देहांतर केले
मात्रावृत्त (१६+१०=२६ मात्रा)