वाहती ओसंडुनी मम भावना हृदयातुनी
प्रेमधन मिळतेच मज मग नाचऱ्या विश्वातुनी
सुख मिळतेच मिळते ना उणे कोठे पडे
जे हवे ते माझियावर बरसते जलदातुनी
संकटे मज घाबरोनी पळुन जाती दूर रे
जोडते नाते खरे मी धर्ममय वचनातुनी
पाहते अन ऐकते मी साद माझ्या आतली
कल्पनेतिल मस्त गोष्टी मिळविते गाण्यातुनी
गझल गाणी आवडीची फँटसी स्वप्नातली
माझिया जगण्यात उतरे देखण्या शब्दातुनी
भावलेले सर्व मजला देव माझा देतसे
तो पुरे ब्रह्मांड देतो त्याचिया जगतातुनी
मंदिरासम एक घरटे माझिया देहातही
माझिया प्रिय सर्व व्यक्ती भेटती घरट्यातुनी
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २६)
लगावली- गालगागा/गालगागा/ गालगागा/ गालगा/