चिमटा झारा फुकनी असुदे माय मोडुनी कलम बनविते
कोंड्याचा ती मांडा करुनी घास पिलांच्या मुखी भरविते
कधी चाक तर कधी अश्वही कधी सारथी माय होतसे
चाबुक हाती घेत विजेचा संसाराच्या रथा पळविते
आय बाय वा अम्मी मम्मी अनेक रूपे माय वावरे
आईची ती आऊ होउन ताक घुसळते तूप कढविते
बोट धरोनी शाळेमध्ये वेळेवर बाळांना नेते
हात पकडुनी हलके हलके लिहावयाला माय शिकविते
भट्टीमध्ये मऊ मृदेला माय भाजते लाल बनविते
पक्क्या मातीच्या गोळ्यातुन एक मूर्त साजिरी घडविते
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)