पुण्य खूप कमविलेस फेडणार पाप कोण
कर्मनिर्जरा तुझीच द्यावयास जाप कोण
हा पुढे उभाय वाघ तापमापि ही प्रचंड
प्रश्न फक्त एवढाच मोजणार ताप कोण
बंदुकीत मी कधीच दारु पूर्ण ठासलीय
भांडणास रंग हाच ओढणार चाप कोण
हा महाल नाहतोय चांदण्यात संपदेत
उंबऱ्यात ज्ञानदीप उलथणार माप कोण
मंगळास काळसर्प कोंडतोय कुंडलीत
सापळा पुरा तयार कोंडणार साप कोण
धाव धाव सांगतात त्या अजाण बालकास
लागली उरात आत ऐकणार धाप कोण
गच्च दार लावलेय दंग ढंग दावण्यात
तूच सांग एकवार माय कोण बाप कोण
वृत्त – चंचला, मात्रा २४