अलवार भावनांना तुडवू नकोस आता
शब्दांस ठोकुनीया घडवू नकोस आता
खिडकीत लोचनांच्या पाऊस दाटलेला
म्हणतो मला पडूदे अडवू नकोस आता
भिजवून मृण्मयीला मृदगंध वाहु द्यावा
कोंडून तप्त वाफा रडवू नकोस आता
चाफ्यासमान प्रीती माझीच माझियावर
दरवळ तिचा सुगंधी दडवू नकोस आता
उठतात का शहारे पानांवरी वहीच्या
पानांवरी फवारे उडवू नकोस आता
गोंजार भावनांना बाळे जणू तुझी ती
भावांस लेखणीने बडवू नकोस आता
वाटून टाक सारे धनधान्य राहिलेले
लपवून ते दुकानी किडवू नकोस आता
जे वाटते लिहावे जावे उतू लिहोनी
भरतीस थोपवूनी पिडवू नकोस आता
सरली तहान वेडी मज लेखणीच सांगे
डोहात सांजवेळी बुडवू नकोस आता
सोडून डाव अर्धा जाणार ना तरीही
माझ्यावरी जिवाला जडवू नकोस आता
मक्ता सुरेल माझा जणू नाव डोलणारी
मक्त्यात नाव कोठे चिडवू नकोस आता