भांडू नये कुणाशी – BHAANDOO NAYE KUNAASHEE


भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते
भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते

सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी
भांडायला अताशा कोणी कसे न मिळते?

स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी
टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते

भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे
त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते

मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते
जो दाद देत नाही त्यालाच मस्त छळते

वाटे मिऱ्या सदा मी डोईवरी बसोनी
ते टाळतात मजला पण मी कधी न टळते

बिनधास्त भांडणारी आहे सखी ‘सुनेत्रा’
येता इथे समूही शब्दामधून गळते

आनंदकंद -अक्षरगणवॄत्त
लगावलीः गागालगा लगागा गागालगा लगागा
मात्राः २२१२ १२२ २२१२ १२२ = २४ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.