मम हृदयाची सतार वाजे दिडदा दिडदा
अन गझलांची सतार वाजे दिडदा दिडदा
मनापासुनी पोळ्या लाटे आई जेव्हा
तिच्या करांची सतार वाजे दिडदा दिडदा
वृत्त वेगळे जुना काफिया रदीफ घेउन
शब्द शरांची सतार वाजे दिडदा दिडदा
अंतरातले भाव सांगण्या मते मांडण्या
मृदुल जिव्हांची सतार वाजे दिडदा दिडदा
बिजलीचा कडकडाट होता वादळराती
कृष्ण घनांची सतार वाजे दिडदा दिडदा
ऊन पावसामध्ये गगनी इंद्रधनूच्या
कैक परांची सतार वाजे दिडदा दिडदा
पुस्तकातल्या पानांमधल्या नाजुक सुरभित
बकुळ फुलांची सतार वाजे दिडदा दिडदा
मित्र मैत्रिणी अगणित सुंदर त्यांच्यासाठी
मुक्त खगांची सतार वाजे दिडदा दिडदा
शशांक मधुरा सुभाषसंगे गिटार होउन
मुग्ध क्षणांची सतार वाजे दिडदा दिडदा
शिशिरामध्ये प्रेम लपेटुन रचे ‘सुनेत्रा’
त्या गीतांची सतार वाजे दिडदा दिडदा
गझल – मात्रावृत्त (१६+८=२४मात्रा)