कळाया नव्याने मला सापडे ती
सदा घोळ घाले तरी आवडे ती
किती नाक अपरे नयन नीलकांती
जणू बाहुली बोलते बोबडे ती
तुझी बायको तिज कसे मी म्हणावे
कधी सारवीते तुझे झोपडे ती
तुला तीट लावे तुझी दृष्ट काढे
तुला घालते अंगडे टोपडे ती
बटा स्वैर उडता कुरळ कुंतलाच्या
तया तेल भारीतले चोपडे ती
जरी अर्घ्य देते तरी नवस बोले
पुन्हा नित्य घाले तुला साकडे ती
तिचा देव दगडात नाही तरीही
कसे वागते रे असे भाबडे ती
अक्षरगणवृत्त – मात्रा २०
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/