माझ्यावरी फिदा ही – MAAZYAAVAREE FIDAA HEE


माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी
ती तोलते मलाही आहे किती शहाणी

मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने
हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी

दचकून जाग आता मजला कधी न येते
असते सदैव जागी माझ्यात एक राणी

अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती
असली पिके विकाया लिहितात ते कहाणी

माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी
गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप वाणी

पोराटकी पुरेना अन नाटके फुकाची
स्मरुनी तिच्या गुणांना गाऊत गोड गाणी

तृष्णा-तहान शमण्या या लालची जनांची
भरलेत माठ सारे या प्यावयास पाणी

आनंदकंद -अक्षरगणवॄत्त
लगावलीः गागालगा लगागा गागालगा लगागा
मात्राः २२१२ १२२ २२१२ १२२ = २४ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.