ऐकायाला बोलायाला तुझ्यासवे मी आहे आज
पूर्ण भराया अर्धा प्याला तुझ्यासवे मी आहे आज
विसरुनी जा सारी व्यवधाने लिही सोडुनी मुक्त मनास
लेखणीतुनी सांडायाला तुझ्यासवे मी आहे आज
कागदावरीसळसळताना नागिण काळी होशिल ना ग
कात पुराणी टाकायाला तुझ्यासवे मी आहे आज
गझलीयत अन काफियातिल अलामतीला ठेव जपून
गझल भावघन फुलवायाला तुझ्यासवे मी आहे आज
पुन्हा कसे मी तैसे गाऊ प्रश्न कशाला असले सांग
सूर ताल लय पकडायाला तुझ्यासवे मी आहे आज
मिसरे माझे जल लहरींवर वहात जाती बनून नाव
नाव कागदी बनवायाला तुझ्यासवे मी आहे आज
टोक तासुनी पेन्सीलीचे नाव ‘सुनेत्रा’ लिहिले खास
मक्ता पुढचा रेखायाला तुझ्यासवे मी आहे आज
गझल – मात्रावृत्त (मात्रा ३२)